मुंबई - आयपीएलच्या १४ व्या हंगामात सोमवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन तगड्या संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यातदणकेबाज शतक झळकावले. पण त्याचे शतक व्यर्थ ठरले. असे असले तरी सॅमसनने विराट, रोहित या सारख्या मातब्बर खेळाडूंना, न करता आलेला विक्रम आपल्या नावे केला आहे.
सॅमसनने फक्त ५४ चेंडूत शतक झळकावले. आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील सॅमसनचे हे तिसरे शतक ठरले. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर सॅमसनचा क्रमांक लागतो. विराटने पाच शतक केली आहेत.
कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सॅमसनच्या नावावर आहे. याआधी पदार्पणात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने केल्या होत्या. त्याने २०१८ मध्ये ९३ धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम सॅमसनने मोडित काढला.