चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन तुल्यबळ संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आयपीएलचा १३वा हंगाम कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात आला होता. यात रोहितच्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे यंदाही मुंबईलाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
मुंबईच्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा -
मुंबई इंडियन्सच्या संघात कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात केरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या स्टार परदेशी खेळाडू आहेत. यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड मानले जात आहे.
बंगळुरूची मदार विराट-डिव्हिलियर्सवर
दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात, विराटसह युवा देवदत्त पडीक्कल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तसेच एबी डिव्हिलियर्स, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन देखील बंगळुरूतआहे. त्यामुळे दोन्ही संघातील सामना रोमांचक होण्याची आशा आहे. दरम्यान, उभय संघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटाला सुरूवात होईल.