चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा सलामीचा सामना सुरू होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. हा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी विराटने आपल्या संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवला.
आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आरसीबीचा तमू पाहायला मिळत आहे. यात संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटिच आणि कर्णधार विराट कोहली संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढवताना पाहायला मिळत आहेत.
विराट म्हणाला, 'माझी इच्छा आहे की, संघातील सर्व खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावून खेळावं. या हंगामात होणाऱ्या सर्व सामन्यात, ज्यात खेळण्याची संधी मिळेल, त्याचा आनंद घ्यावा. मागील हंगाम आपल्यासाठी चांगला ठरला होता. यंदाच्या हंगामात देखील आपल्याला आणखी चांगली कामगिरी करायची आहे. '
विराटने संघात नव्याने सामिल झालेल्या खेळाडूंचे स्वागत देखील केले. दरम्यान, मुंबई विरुद्ध बंगळुरू यांच्यातील सामन्याला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.