मुंबई - राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.
बेन स्टोक्सला कशी झाली दुखापत -
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सोमवारी सामना पार पडला. या सामन्यातील पंजाबच्या डावातील १० व्या षटकात ख्रिस गेलचा झेल बेन स्टोक्सने सूर मारत टिपला. या दरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. त्याचे बोट तुटल्याची माहिती राजस्थान रॉयल्सने दिली आहे. यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. पण तो आयपीएलच्या फायनलपर्यंत संघासोबतच राहणार आहे.
राजस्थान रॉयल्सने काय म्हटलं -
राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्सच्या दुखापतीविषयी ट्विट करत माहिती दिली. बेन स्टोक्सचे बोट मोडल्यामुळे दुर्दैवाने त्याला आयपीएल २०२१ मधील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. मात्र स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघासोबत ऑफ फील्ड राहून मदत करेल, असे राजस्थानने म्हटलं आहे.