मुंबई -आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. शनिवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सख्ख्या भावांमधील दंद्व पाहायला मिळाले.
इंग्लंडकडून खेळणारे दोन सख्ख्ये भाऊ सॅम कुरेन आणि टॉम कुरेन हे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करतात. सॅम चेन्नईत तर टॉम दिल्लीसाठी खेळतो. चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात छोटा भाऊ सॅम कुरेन मोठा भाऊ टॉम कुरेनच्या गोलंदाजीवर तुटून पडला. त्याने टॉमच्या एका षटकामध्ये २३ धावा वसूल केल्या. सॅमच्या डेथ ओव्हरमधील या खेळीमुळे चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
टॉम चेन्नईच्या डावातील १९ वे षटक फेकण्यासाठी आला. तेव्हा सॅम आणि जडेजा फलंदाजी करत होते. जडेजाने टॉमचे स्वागत चौकाराने केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघाली. पुढचा चेंडू वाईड ठरला. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सॅमने लागोपाठ दोन षटकार खेचले. पाचव्या चेंडूवर सॅमने चौकार वसूल केला. अखेरच्या चेंडूवर एक धाव मिळाली. अशा पद्धतीने टॉमने त्या षटकात २३ धावा बहाल केल्या.