चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पहिला सामना १० एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या हंगामाला सुरुवात होण्याआधी चेन्नईने त्यांच्या संघात यंदा नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंचे खास स्वागत केले.
आयपीएल २०२१ हंगामासाठी झालेल्या लिलावाआधी चेन्नईने रॉबिन उथप्पाला ट्रेडिंग विंडोद्वारे राजस्थान रॉयल्सकडून आपल्या संघात सामील करुन घेतले होते. त्यानंतर लिलावात चेन्नईने इंग्लंडचा मोईन अली, भारताचे कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, के भगत वर्मा, सी हरी निशांत आणि एम हरिशंकर रेड्डी यांना खरेदी केले. दरम्यान, चेन्नईने लिलावापूर्वी ६ खेळाडूंना मुक्त केले होते. त्यामुळे एकूण ७ खेळाडूंसाठी चेन्नई संघात जागा रिकामी झाली होती.
चेन्नईने संघात नव्याने दाखल झालेल्या खेळाडूंचे बुधवारी संघाचे अधिकृत किट देऊन स्वागत करण्यात आले. हे किट चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनीच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या स्वागत सोहळ्याचे फोटो चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी राहिली. त्यांना १४ सामन्यांमधील केवळ ६ विजयांसह गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.