मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. बुधवारी (ता. २०) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपल्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामुळे आता प्रत्येक संघाच्या पर्समध्ये शिल्लक रक्कमेत वाढ झाली आहे. तसेच प्रत्येक संघाचा देशी-विदेशी खेळाडूंचा कोटा देखील वाढला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोईन अली, शिवम दुबे, गुरकीरत सिंह मान, अॅरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, पार्थिव पटेल, डेल स्टेन, इसुरु उडाना आणि उमेश यादव यांना रिलीज केले आहे. आता त्यांच्याकडे ३५.९० कोटी रुपयांची शिल्लक रक्कम आहे. यातून ते ९ भारतीय व ४ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतात.
चेन्नई सुपर किंग्सने केदार जाधव, हरभजन सिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन यांना करारमुक्त केले आहे. चेन्नईकडे २२.९ कोटी शिल्लक रक्कम आहे. यातून ते ६ भारतीय व १ परदेशी खेळाडू भरू शकतात.
सनरायजर्स हैदराबादने बिली स्टेनलेक, विराट सिंह, बावनका संदीप, फैबियन एलन आणि संजय यादव यांना रिलीज केले आहे. सद्य घडीला हैदराबादकडे १०.१ कोटी रुपये शिल्लक रक्कम आहे. यातून ते २ भारतीय व १ विदेशी खेळाडू भरू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सने मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स कैरी, जेसन रॉय यांना करारमुक्त केले आहे. दिल्लीकडे १२.९० कोटी शिल्लक रक्कम आहे. यातून त्यांना ४ भारतीय व २ परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेता येते.