चेन्नई - सलामीवीर नितीश राणा (80) आणि राहुल त्रिपाठी (53) अर्धशतकांच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ६ बाद १८७ धावा करत हैदराबादसमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले.
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नर व वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरूवात केली. हरभजनसिंगच्या अंतिम चेंडूवर साहाने षटकार ठोकून पहिल्या षटकात ८ धावा वसूल केल्या. मात्र, त्यानंतर हैदराबादच्या डावाला गळती लागली. दुसऱ्या षटकात सलामीवीर डेव्हि़ड वॉर्नर यष्टीमागे झेल देऊन माघारी परतला. प्रसिध कृष्णाने वॉर्नरची विकेट घेतली. वॉर्नरनंतर वृद्धिमान साहादेखील अधिक काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. शाकिब अल हसनने साहाची दांडी गुल केली. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादचा डाव सावरला. 8व्या षटकात हैदराबादने आपले अर्धशतक साकारले. बेअरस्टो आणि पांडे यांनी उपयुक्त भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. 12व्या षटकात बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर बेअरस्टो कमिन्सच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांची खेळी केली.
त्यापूर्वी केकेआरकडून शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी सलामी दिली. नितीश राणाने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. संदीपच्या चौथ्या षटकात राणा-गिलने १४ धावा वसूल केल्या. केकेआरने ४ षटकानंतर बिनबाद ३३ धावा केल्या, नितीश राणाने संदीप शर्माच्या गोलंदाजीची पिसे काढत सलग तीन चौकार लगावले. भुवनेश्वर, संदीप शर्मा आणि टी. नटराजन या हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या दोघांनी पहिल्या पाच षटकात 45 धावांची दमदार सलामी दिली.