दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात रविवारी डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल राजस्थानच्या राहुल तेवतिया आणि रियान पराग जोडीने सहाव्या गड्यासाठी नाबाद ८५ धावांची भागिदारी करत सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. तेवतिया-पराग जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांवर 'हल्ला बोल' करत अशक्यप्राय वाटणारा विजय राजस्थानला मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात तेवतिया आणि हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद यांच्यात बाचाबाची झाली.
घडले असे की, खलील अहमद अखेरचे षटक टाकत होता. यावेळी खलील आणि तेवतिया यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तेवतियाने खलील अहमदला शेवटच्या षटकात डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, खलील अहमदने त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करत गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केले. मात्र, विजयानंतर तेवतियाचा पारा अधिक चढला. खलील आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मध्यस्थी करत हा वाद शांत केला.