शारजाह - राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने १६ धावांनी विजय मिळवला. यासह राजस्थानने विजयी सुरूवात केली. सीएसके भलेही या सामन्यात पराभूत झाली तरी, धोनीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. त्याने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकत नाबाद २२ धावा केल्या. धोनीने मारलेला यातील एक षटकार तर थेट मैदानाबाहेर गेला. रस्त्यावरुन जात असलेल्या एका व्यक्तीला तो चेंडू मिळाला, तेव्हा तो व्यक्ती चेंडू घेऊन तेथून पसार झाला. यामुळे पंचांना दुसरा चेंडू घ्यावा लागला.
राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टिव स्मिथ आणि संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर जंगी सुरूवात केली. यावर जोफ्रा आर्चरने स्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश करत चेन्नई सुपर किंग्ज समोर २१७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २० षटकांत २०० धावांपर्यंतच मजल मारू शकला. यात धोनीने सलग तीन षटकारांसह नाबाद २२ धावा केल्या. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.