दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसरा सामना, दिल्ली विरुद्ध पंजाब हा चांगलाच अटीतटीचा आणि थरारक ठरला. दिल्लीच्या संघाने या सामन्यात सुपर ओवरमध्ये बाजी मारली. मात्र अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील सदोष पंचगिरीसंदर्भात दिग्गजांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पंजाब संघाचा मार्गदर्शक असणाऱ्या विरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण तसेच पंजाब किंग्स इलेव्हनची मालकीण बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिनेही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामन्यात, दिल्लीचा खेळाडू मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सामन्याच्या पंचांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा, असा उपरोधक टोला लगावला आहे. त्याने ट्विटवरुन हा टोला लगावला आहे.
मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली, त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता आणि याच एका रनचा फरक नंतर पडला, अशा आशयाचे ट्विट सेहवागने केले आहे.