मुंबई- आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नव्या नावाने मैदानात उतरू शकते. आरसीबीने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे नाव बदलले आहे. यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटसह इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटो हटवला आहे. तसेच ट्विटर अकाऊंटचे नाव 'रॉयल चॅलेंजर्स' असे केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संघाचे नाव बदल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच नव्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
विराट कोहली, एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल, डेल स्टेन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या आरसीबीला आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावता आलेले नाही. यामुळे नावात बदल करून मैदानात उतरण्याचा विचार आरसीबी व्यवस्थापन करत आहे.
आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीने या संदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यानं, आरसीबीच्या सोशल मीडियावर बदल झाले आणि त्याची पुसटशी कल्पना कर्णधाराला नाही. काही मदत लागल्यास नक्की कळवा, असं म्हटलं आहे.
दरम्यान, याआधी दिल्लीने आपले नाव बदलले होते. त्यांनी 'दिल्ली डेअर डेविल्स' हे नाव बदलून संघाचे नाव 'दिल्ली कॅपिटल्स' असे केले आहे. विशेष बाब म्हणजे, दिल्ली संघाने नव्या नावासह चांगली कामगिरी केली होती.