अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात बुधवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामना पार पडला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई हा सामना ५ गडी राखून जिंकला. या सामन्यादरम्यान बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने स्लेजिंग केले. तो सूर्यकुमार यादवच्या दिशेने आला आणि त्याला खुन्नस देत त्याला उकसवण्याचा प्रयत्न केला. पण यावर सूर्यकुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, उलट तो तिकडून शांतपणे निघून गेला.
सूर्यकुमारने मैदानात अखेरपर्यंत तळ ठोकत मुंबईला सामना जिंकून दिला. विजयानंतरही सूर्यकुमारने उत्साहात कोणताही इशारा केला नाही. तसेच त्याने या सामन्यात विराटने केलेल्या कृतीला देखील कोणतेही प्रत्युत्तर न देता त्याने प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मन जिंकले.
काय घडले -
या सामन्यात डेल स्टेनने टाकलेल्या १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर विराटने फिल्डिंग केली. ते षटक संपल्यानंतर विराट चालत सूर्यकुमारकडे आला आणि त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत उभा राहिला. सूर्यकुमार यादव यानेदेखील त्याच्या नजरेत नजर घालून पहिले आणि तिथून निघून गेला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर हे व्हायरल झाले आणि विराटवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.