मुंबई - राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदवली आहे. ते तीन सामन्यात दोन विजयासह चार गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानी आहेत. राजस्थानच्या दोन विजयात संजू सॅमसनने धडाकेबाज खेळी केल्या. यात त्याने दोन अर्धशतक झळकावले. संजूच्या या कामगिरीवर भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना चांगलीच प्रभावित झाली आहे. तिने संजूमुळे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.
स्मृती मंधानाने एका इंग्रजी माध्यमाला मुलाखत दिली. यात तिने सांगितले, की संजू सध्या आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. ते पाहायला मला खूप आवडते. त्यांच्या फलंदाजीची मी चाहती झाली आहे. त्याच्यामुळेच मी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करायला लागली आहे.
संजू बेधडक ज्या पद्धतीने फटकेबाजी करतो ते पाहून, तो सध्या वेगळ्या दर्जाचा खेळ करतो आहे याची प्रचिती येते. मी सध्या आयपीएलमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांकडून सर्वकाही शिकून घ्यायचे ठरवले असल्याचेही स्मृतीने सांगितलं.