मुंबई -कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएलचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा प्रभाव असाच राहिला तर, आयपीएलचे पुढे काय होईल हे सांगणे कठीण झाले आहे. दरम्यान, मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात आयपीएलमधील फ्रँचायझी मालक आणि बीसीसीआय यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने महत्वाचे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा -न्यूझीलंडच्या गोलंदाजाची कोरोना चाचणी 'नेगेटिव्ह'
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) झाल्यास सामन्यांच्या संख्येत कपात होईल, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे. 'सध्या तरी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत होणार नाही. म्हणजेच हे दिवस वायाच जाणार आहेत. त्यामुळे सामन्यांची संख्या कमी होणे स्वाभाविक आहे. पण नेमके किती सामने होतील, हे मला सध्या तरी सांगता येणार नाही', असे दादाने म्हटले आहे.
किंग्ज इलेव्हन संघाचे सहमालक नेस वाडिया यांनीही या बैठकीआधी, लोकांच्या जीवापेक्षा आयपीएल महत्वाचे नसल्याचे म्हटले आहे. 'जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न येत असतो, तिथे काही चालढकल करून चालणार नाही. आयपीएल रद्द करून लोकांचे जीव वाचवले तर ते योग्य ठरेल. कोणतीही दुर्घटना होण्यापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही चांगली, हे माझे मत आहे'. असे एका क्रीडा वाहिनीशी बोलताना वाडिया म्हणाले आहेत.