दुबई - राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर रोमांचक सामन्यात विजय मिळवला. राहुल तेवतिया आणि रियान पराग या जोडीने राजस्थानला पराभवाच्या खायीतून बाहेर काढत अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. सलग चार पराभवानंतर राजस्थानला विजयाची चव चाखला आली. दरम्यान, या सामन्यात राहुल तेवतियासोबत आसामचा १८ वर्षीय खेळाडू रियान परागने महत्वपूर्ण खेळी केली. राजस्थानच्या विजयानंतर परागने आसामचा पारंपरिक बिहु डान्स केला. याचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हैदराबादच्या १५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था ५ बाद ७८ अशी झाली होती. हा सामना हैदराबाद जिंकणार असे वाटत होते. तेव्हा राहुल तेवतिया आणि रियान पराग या जोडीने सुरूवातीला सावध खेळ केला. त्यानंतर त्यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४७ चेंडूत नाबाद ८५ धावांची भागिदारी केली. यात तेवतियाने २८ चेंडूत ४५ धावा केल्या. तर परागने २६ चेंडूत ४२ धावा काढल्या.