आबुधाबी - कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही नवे नियम तयार केले आहेत. अशात आयपीएलच्या तेराव्या हंगामात यातील एका नियमाचे उल्लंघन भारतीय खेळाडूने केले. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रॉबिन उथप्पाने आयसीसीच्या एका नियमाचा भंग केला.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉबिन उथप्पाने सामना सुरू असताना तिसऱ्या षटकात सुनील नरेनचा कॅच सोडला. त्यानंतर त्याने चेंडू घेत त्यावर थुंकी लावली. उथप्पाने केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, कोरोना पसरण्याची भीती असल्यामुळे खेळाडूंना चेंडूवर थुंकी लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आयसीसीने या वर्षी जून महिन्यात चेंडूवर थुंकी लावण्यासाठी बंदी घातली आहे. आयसीसीचा हा नियम उथप्पाने मोडला. दरम्यान, यासंदर्भात अद्याप आयपीएलकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आले नाही.