दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत दमदार कामगिरी नोंदवलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्याचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे पुढील काही सामन्यातून बाहेर झाला आहे. याची माहिती दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिली. पंतची दुखापत दिल्लीसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. तो क्षेत्ररक्षण दरम्यान, लंगडताना पाहायला मिळाला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. आता त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
पंतच्या दुखापतीविषयी कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, 'मी डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं आहे की, पंतला किमान एक आठवडा तरी आराम करावा लागणार आहे. पण, पंत कधी संघात परतणार याविषयी आत्ताच सांगणे कठीण आहे.'