अबुधाबी - आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला आणि प्ले-ऑफमध्ये आपले स्थान जवळपास निश्चीत केले. मुंबईच्या विजयात चमकला सूर्यकुमार यादव. त्याने या सामन्यात नाबाद ७९ धावांची खेळी करत मुंबईला विजयी केले. सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने एका खास व्हिडीओ इंटरव्ह्यूत त्याच्या या खेळीबद्दल आणि संघाच्या रणनीतीबद्दल सांगितले.
सूर्यकुमारने काय सांगतलं?
मैदानावर स्थिरावणे हे माझ्यासमोरचे सर्वात प्रथम उद्दिष्ट होते. यानंतर पहिल्या टाइम आऊटमध्ये ड्रेसिंग रुममधून रोहित आणि महेला सरांनीही मला शेवटपर्यंत खेळत रहा, निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा मॅसेज पाठवला. त्याप्रमाणे मी खेळत गेलो, असे सूर्यकुमारने सांगितले. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
प्रशिक्षक महेला जयवर्धनेकडून सूर्यकुमारचे कौतूक -
या व्हिडीओत महेला जयवर्धने यांनी सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक केले. सूर्यकुमारचा हा सर्वोत्तम खेळ होता. चेन्नईतल्या कठीण परिस्थितीमध्ये विकेट गमावल्यानंतर त्याने केलेली खेळी आणि आजची खेळी या त्याच्या सर्वोत्तम खेळी असल्याचे जयवर्धने यांनी सांगितले. सूर्यकुमारने तो किती परिपक्व खेळाडू आहे, हे दाखवून दिले आहे. तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन आम्हाला जिंकवून दिले आहे, असेही जयवर्धने यांनी सांगितले.
मी आहे ना, सूर्यकुमारचे विजयानंतर खास सेलिब्रेशन -
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड निश्चीत मानली जात होती. पण निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आणि त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी दिली नाही. पण सूर्यकुमारने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरू संघाविरोधात मॅच विनिंग खेळी साकारली आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. मुंबईच्या विजयानंतर त्याने 'मी आहे ना' असा इशारा ड्रेसिंग रुमच्या दिशेने केला.
हेह वाचा -RCB VS MI : मै हू ना..! मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्यकुमारची बोलकी प्रतिक्रिया
हेह वाचा -RCB VS MI : हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस यांच्यात बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल