नवी दिल्ली - आयपीएल २०२० हंगामाला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी सर्वच संघानी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. यात नवनवीन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टामध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने सुरू केला आहे. याच पार्श्वभूमिवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या प्रशिक्षण वर्गात एक नवीन महिला सदस्याची भरती केली आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात एकही विजेतेपद पटकवता न आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने, नवनीता गौतमची नियुक्ती संघाच्या मसाज थेरपिस्ट म्हणून केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात घोषणा केली आहे. दरम्यान, आपीएलच्या इतिहासात प्रशिक्षण वर्गात महिलांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघाला मागील १३ हंगामात एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. बंगळुरूने तीनवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागील सत्रात त्याला सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.