शारजाह -इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मात्र, राजस्थानला सामोरे जाणे हे त्यांच्यापुढे एक मोठे आव्हान असणार आहे. दिल्लीचे फलंदाज आणि गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
दिल्लीसाठी फलंदाजीमध्ये पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉइनिस प्रत्येक सामन्यात योगदान देत आहेत. गोलंदाजीत कगिसो रबाडा दिल्लीचे प्रमुख अस्त्र आहे. तो या मोसमात संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्ट्जेसुद्धा संघाच्या गरजेनुसार कामगिरी दाखवत आहे. फिरकीपटूंमध्ये रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल संघात आहेत.
सलग तीन सामन्यांत पराभव पत्करल्याने राजस्थानची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्या दोन सामन्यांत दिमाखात फटकेबाजी करणारा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन सध्या धावांसाठी झगडत आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि टॉम करन यांच्यावर राजस्थानची मदार आहे. फिरकी गोलंदाज राहुल तेवतियाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.