नवी दिल्ली -जगातील सर्वात रोमांचक लीग इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) लाखो चाहते आहेत. प्रत्येक क्रिकेटपटूचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न असते. दरवर्षी अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपटू आयपीएलच्या लिलावाच्या दिवशी लक्षाधीश होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या धोरणात बदल केला आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेची बक्षीस रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. बीसीसीआयने प्रत्येक फ्रेंचायझीला एक पत्र पाठवले आहे. यावर्षी २० कोटींऐवजी १० कोटी बक्षीस रक्कम देण्यात येईल, असे बीसीसीआयने पत्रात म्हटले आहे.
बीसीसीआयने म्हटले, ''बक्षिसाच्या रकमेत कपात करण्यात येत आहे. उपविजेत्या संघाला १२.५ कोटीऐवजी ६.२५ कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला प्रत्येकी ४.३७५ कोटी मिळतील. सर्व फ्रेंचायझी प्रायोजकत्वाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवत आहेत. त्यामुळे बक्षीस रकमेबाबत निर्णय घेण्यात आला आहे."
भारताचा कडवा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचीही स्वतः ची लीग आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) २०२०च्या मोसमात बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पीएसएलमध्ये विजयी संघाला सुमारे सात कोटी देण्यात येणार आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेतील विजेत्याला ३ कोटी ३१ लाख रूपये देण्यात येतात.