दुबई - मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. दरम्यान, मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर गुणलातिकेत नेमके काय बदल झाले, पाहा...
मुंबई आणि राजस्थान या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. दिल्ली कॅपिटल्स अव्वल होते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाने पाच सामने खेळलेले होते. यात तीन विजय तर दोन पराभवाचा समावेश होता. राजस्थानविरुद्धचा सामना जिंकल्यावर मुंबईच्या संघाचे ८ गुण झाले. त्याचबरोबर त्यांचा रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वलस्थान पटकावता आले. मुंबईने दिल्लीला खाली खेचत अव्वलस्थान पटकावले.
दुसरीकडे राजस्थानचा संघ उभय संघातील सामन्यापूर्वी पाचव्या स्थानावर होता. कारण यापूर्वी झालेल्या चार सामन्यांमध्ये राजस्थानला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण मुंबईविरुद्ध त्यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांची घसरण झाली. राजस्थान पाचव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर फेकला गेला आहे.