दुबई - सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभवचा धक्का दिला. हैदराबादने दिल्लीवर ८८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत मोठा बदल केला. यात दिल्लीचे नुकसान झाले. तर हैदराबादने मोठी झेप घेतली. हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्यानंतर गुणतालिकेत काय बदल झाले पाहा...
हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान कायम -
दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघाने ११ सामने खेळली होती. यात त्यांना चार विजय मिळवता आले होते, तर सात पराभव पत्करावे लागले होते. पण दिल्लीवर मोठा विजय मिळवत हैदराबादने दोन गुणांची कमाई केली. याशिवाय, त्यांचा रनरेटही चांगलाच वाढला. हैदराबादचे १० गुण झाले असून त्यांनी सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे त्यांचे या आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे.
दिल्लीची घसरण, बंगळुरूला फायदा -
दिल्लीच्या संघाला हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर चांगलाच धक्का बसला. कारण या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने ११ सामने खेळली होती. यात त्यांनी सात विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही दिल्लीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दिल्लीच्या संघाची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेतील दुसरे स्थान आता बंगळुरूने पटकावले आहे.
अशी आहे गुणतालिकेची स्थिती -
सद्यघडीला मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर बंगळुरूचा संघ पोहोचला आहे. तर तिसऱ्या स्थानावर दिल्लीची घसरण झाली आहे. चौथ्या स्थानावर सलग पाच विजय मिळवणारा पंजाबचा संघ आहे. तर कोलकाता पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या आणि सातव्या स्थानी अनुक्रमे हैदराबाद आणि राजस्थानचा संघ आहे. धोनीचा चेन्नई संघ आठव्या स्थानावर आहे.