मुंबई - मयांक अगरवालचं शतक आणि केएल राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावर पंजाबने राजस्थानला २२४ धावांचे आव्हान दिले. तेव्हा राजस्थानने शारजाहच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत सामना ४ गडी राखून जिंकला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना चांगलाच रंगतदार ठरला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवल्यावर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दोन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सनेही दोन विजय मिळवले आहेत. पण नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दोघांकडेही चार गुण असले तरी दिल्ली अव्वल स्थानी आहे. तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे.
पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. पंजाबचा संघ राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर होता. कारण यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी पंजाबने एक सामना जिंकता होता, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. आजच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पंजाबचा संघ हा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ हा तिसऱ्यावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे.