शारजाह - किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयी 'पंच' लगावला. पंजाबने सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकातावर ८ गडी राखून विजय मिळवला. पंजाबने या सामन्यातच कोलकाताला धक्का दिला नाही, तर गुणतालिकेतही त्यांना पिछाडीवर ढकलले. पाहा, पंजाब विरूद्ध कोलकाता सामन्यानंतर गुणतालिकेत कोणते बदल झाले....
पंजाबची बल्ले-बल्ले
कोलकाता विरुद्धच्या सामन्याआधी पंजाबच्या संघाने ११ सामने खेळले होते. यात त्यांना ५ विजय मिळता आले होते, तर त्यांना ६ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पंजाबच्या संघाचे या सामन्यापूर्वी १० गुण होते. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई केली. आता पंजाबचे १२ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत कोलकाताला धक्का देत चौथे स्थान पटकावले आहे. कोलकाताची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
कोलकाताची घसरण
पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी कोलकाताच्या संघाने ११ सामने खेळले होते. यात त्यांना ६ विजय मिळवता आले होते, तर त्यांना ५ सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला होता. पण गेले काही दिवस कोलकाताने गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखले होते. पण पंजाबविरुद्धच्या सामन्यातील पराभावामुळे त्यांना चौथे स्थान गमवावे लागले आहे. सध्याच्या घडीला पंजाब आणि कोलकाता यांचे समान १२ गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट हा कोलकातापेक्षा चांगला असल्यामुळे त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे.
अशी आहे गुणतालिकेची सद्यस्थिती
सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ यावेळी तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानी पंजाब पोहोचला आहे. तर कोलकाताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि हैदराबाद आहे. धोनीचा चेन्नई संघ तळाशी म्हणजे आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा -IPL २०२० : रोहित शर्माच्या दुखापतीविषयी मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स
हेही वाचा -SRH VS DC : हैदराबाद-दिल्ली यांच्यात लढत, कॅपिटल्सचे प्ले ऑफचे लक्ष्य