मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने जर्सी बदलली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने आपली नवी जर्सी, चाहत्यांसमोर आणली. मुंबईची जर्सी काही प्रमाणात मागील वर्षासारखीच गडद निळ्या रंगाची आहे. खांद्यावर आणि कमरेवर गोल्डन रंगाच्या पट्ट्या नव्या जर्सीवर पाहायला मिळत आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करत नवी जर्सी रिलीज केली. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती नव्या जर्सीसह डान्स करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या, 'दुनिया हिला देंगे हम' हे गाणे बॅकग्राऊंडला ऐकावयास मिळत आहे. या जर्सीचे प्री-ऑर्डर ऑनलाईनवर सुरू करण्यात आले आहे.
आयपीएल २०२० ची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. देशातील कोरोनाचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. सर्व संघ स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखल झाले आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडू आणि स्टाप कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण कोरोनाच्या भीतीनेच रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्याची चर्चा आहे.