मुंबई - आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. प्रत्येक हंगामात मुंबईचा संघ विजेतेपदाचा दावेदार ठरला आहे. यंदाच्या १३व्या हंगामासाठी देखील मुंबई इंडियन्स फेव्हरेट आहे. विजेतेपद पटकावण्यासाठी मुंबईचे खेळाडू मैदानावर घाम गाळत आहेत. अशात रोहित शर्मा आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यांच्यात एक सामना झाला. या सामन्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी रोहित आणि बुमराह यांच्या सामना व्हावा, अशी इच्छा बोलून दाखवली. तेव्हा मुंबई इंडियन्सने, 'पलटन के डिमांड पर पेश है, रोहित बनाम बुमाराह, कौन जितेगा यह मुकाबला', असे कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
रोहित आणि बुमराह यांच्यात बॅट आणि चेंडूचा सामना झाला नाही. तर 'रॉक पेपर आणि सीजर' या गेमच्या माध्यमातून ते दोघे समोरासमोर आले. यात बुमराह रोहितवर भारी पडला. त्याने रोहितला पराभूत केले. सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा सलामीचा पहिला सामना १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अबूधाबी येथे होणार आहे. हा हंगाम ५३ दिवसांचा असून २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजामध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील.
हेही वाचा -अखेर... IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर; मुंबई-चेन्नई सलामीला भिडणार