अबू धाबी - आयपीएलचा १३ हंगाम खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज वगळता सर्व संघांनी क्रिकेटच्या सरावाला सुरूवात केली आहे. याशिवाय खेळाडू हॉटेलमध्ये कुटुंब आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचा संचालक झहीर खान संघाविषयी माहिती देताना पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्स संघाने शेअर केलेल्या व्हिडिओत खेळाडू मस्ती करताना दिसून येत आहेत. खेळाडूंची व्यवस्था दिव्य अशा हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. स्फोटक फलंदाज हार्दिक पांड्या रॉकस्टार लूकमध्ये स्टेजवर गाणे गाताना दिसून येत आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये टीम रूम, जिम आणि गेम झोनही पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ दरम्यान, झहीरने संपूर्णपणे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना समर्पित केलेली एक वॉलही दाखविली, ज्यात स्टेडियममधील चाहत्यांचे टीमला चीअर करतानाचे फोटो आहेत.