आबुधाबी - आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने, गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत आपणच सलामीच्या सामन्याचे 'किंग्ज' असल्याचे दाखवून दिले. या सामन्यात सर्वांची नजर होती, ती महेंद्रसिंह धोनीवर. कारण धोनी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात परतणार होता. पण तो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी खालच्या फळीत उतरला. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता धोनीच्या या निर्णयाचे कारण समोर आले आहे.
रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी मैदानात येईल, अशी सर्वांची आपेक्षा होती. पण धोनीने इंग्लंडचा २२ वर्षीय खेळाडू सॅम करनला फलंदाजीसाठी पाठवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. डावा-उजवा हे कॉम्बिनेशन कायम रहावे, यासाठी संघाने रणनिती आखली होती. त्या रणनितीचा भाग म्हणून धोनी वरच्या फळीत फलंदाजीसाठी आला नाही. त्याने पहिले जडेजा त्यानंतर करनला पाठवले. याशिवाय धोनीला पाठदुखीचा त्रास होत होता, असे समजते. कारण धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी फिजिओ त्याच्या पाठीवर औषधाचा स्प्रे मारताना दिसून आले.
दरम्यान, सॅम करन बाद झाल्यानंतर अखेर धोनी तब्बल ४३७ दिवसांनी फलंदाजीसाठी आला. १९ व्या षटकात हुक करणाच्या प्रयत्नात असलेल्या चेंडूवर बुमराहने अपिल केले. तेव्हा पंचांनी धोनीला बाद दिले. यावर धोनीने डीआरएस घेऊन पंचाला आपला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. शेवटच्या षटकात डू प्लेसिसने चौकार आणि एक धाव काढत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनी शून्य धावावर नाबाद माघारी परतला.