अबुधाबी - आज आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेल्या मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सामना जिंकणे आवश्यक आहे. सलामी आणि मधल्या फळीतील फलंदाजांचा फॉर्म हा राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे.
राजस्थानच्या संघात बेन स्टोक्स, संजू सॅमसन आणि जोस बटलरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. पण तिघेही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अष्टपैलू राहुल तेवतियाने कामगिरीत सातत्य राखले आहे. वेगवान गोलंदाजीत जोफ्रा आर्चर सध्या फॉर्मात असून त्याला मुंबईच्या मातब्बर फलंदाजांचे आव्हान असणार आहे.
मुंबई संघात आज रोहित शर्मा खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागच्या सामन्यात पोलार्डने संघाचे यशस्वी नेतृत्त्व केले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने सहज विजय साकारला होता. बोल्ट-बुमराहची भेदक गोलंदाजी आणि किशन-डी कॉक यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे मुंबईने चेन्नईला पराभवाचे पाणी पाजले. राजस्थानविरुद्धच्या आजच्या सामन्यात मुंबईकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल.