दुबई - आयपीएलच्या चाहत्यांना एकाच दिवसात आज तीन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्याने हा रविवार सुपर संडे ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाबमध्ये खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने अखेर बाजी मारली आहे. पंजाबचा ख्रिस गेल आणि मयांक अग्रवालने मुंबई इंडियन्सने दिलेले १२ धावांचे आव्हान पूर्ण करत पंजाबला अखेर विजय मिळवून दिला आहे. हा आयपीएल सामना अत्यंत रोमांचक ठरला आहे.
पंजाबने मुंबई इंडियन्सन दिलेल्या धावांचे लक्ष्य गाठून सामना बरोबरीत सोडविला आहे. सामन्यातील विजयी संघ निश्चित करण्यासाठी आयपीएलच्या नियमाप्रमाणे एक सुपर ओव्हर खेळवली गेली. त्यामध्ये पंजाबने मुंबईला विजयासाठी ६ धावांचे आव्हान दिले आहे. पहिली सुपर ओव्हर अनिर्णयीत ठरल्यानंतर आणखी एक सुपरओव्हर खेळविली जात आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सने पंजाबला १२ धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केले.
सलामीवीर क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि केरॉन पोलॉर्डसह नॅथन कुल्टर नाइलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एकवेळ मुंबईचा अवस्था ३ बाद ३८ अशी केविलवाणी झाली होती. तेव्हा एक बाजू पकडून क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावले. यानंतर डेथ ओव्हरमध्ये पोलार्ड-कुल्टर नाइल जोडीने फटकेबाजी करत मुंबईला सन्मानजनक धावासंख्या उभारून दिली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. डावाच्या तिसऱ्याच षटकात रोहित शर्मा (९) माघारी परतला. त्याला अर्शदीप सिंगने क्लिन बोल्ड केले. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू दिला नाही. अर्शदीपने ६व्या षटकात इशान किशनला (७) बाद करून मुंबईला बॅकफूटवर ढकलले. तेव्हा क्विंटन डी कॉक एका बाजूने खिंड लढवली. त्याने कृणाल पांड्यासोबत चौथ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यांची भागिदारी रवी बिश्नोईने फोडली.
कृणाल ३४ धावांवर माघारी परतला आणि मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूंवर खणखणीत षटकार खेचला. हार्दिक (८) मोठे फटके मारणार असे वाटत असताना शमीने त्याला पूरमकरवी झेलबाद केले. दुसरीकडून क्विटन डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याची खेळी ख्रिस जॉर्डनने संपुष्टात आणली. डी कॉकचा झेल मयांकने टिपला. डी कॉकने ४३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली.