आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स आज एकमेकांसमोर उभे टाकतील. दोन तुल्यबळ संघात ही लढत होत असल्याने, हा सामना रोमांचक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोलकाताचा संघ सामना जिंकून स्पर्धेत विजयी सुरूवात करण्यास इच्छुक आहे. तर, दुसरीकडे पहिल्या सामन्यातील पराभव विसरून मुंबई आज होणाऱ्या लढतीत झोकात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्याआधी कोलकाता नाइट रायडर्स संघाचे स्वागत खास पद्धतीने करण्यात आले.
जगातील सगळ्यात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफावर खास रोषणाई करत दुबईमध्ये कोलकाता संघाचे स्वागत करण्यात आले. या रोषणाईचा व्हिडीओ केकेआरने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.
केकेआर संघाचा मालक असणारा बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान हा दुबई टुरिझमच्या जाहिरातीमध्येही यापूर्वी झळकला होता. शाहरुखची दुबईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. केकेआरचे इतर संघांपेक्षा अशा भव्यदिव्य पद्धतीने स्वागत होण्यामागे शाहरुख कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. याआधी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तही बुर्ज खलिफावर विशेष रोषणाई करण्यात आली होती.
आजच्या सामन्यात केकेआरचा संघ मुंबई इंडियन्स संघाच्या तोडीचा आहे. डावाची सुरूवात शुभमन गिल आणि सुनिल नरेन करतील. त्यानंतर इयॉन मॉर्गन, कर्णधार दिनेश कार्तिक आणि आद्रे रसेल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स, कुलदीप यादव, कमलेश नागरकोट्टी यांच्यासह सुनिल नरेन आहे.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघात नामांकित खेळाडूंचा भरणा आहे. यात क्विंटन डी क्वाक, कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट ही नावे घेता येतील. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.