अबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये शनिवारी झालेल्या सलामीची लढत जिंकत चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरूवात केली. चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या विजयात धडाकेबाज फलंदाज अंबाती रायुडूने स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघव्यवस्थापनानेही 'बाहुबली परत आला' अशा शब्दांत रायुडूचे कौतुक केले.
मुंबईच्या १६२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर शेन वॉटसन (४) आणि मुरली विजय (१) पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. त्यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. त्यानंतर अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले. फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.