अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेतील दोन्ही संघांची स्थिती तशी सारखीच आहे. त्यामुळे बाद फेरीचे आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना सोमवारी विजय अत्यावश्यक आहे. या सामन्यातील पराभव प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरेल, याची कल्पना उभय संघांना आहे. सुपर किंग्ज व रॉयल्स आठ संघांच्या गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या व आठव्या स्थानी आहेत.
राजस्थान संघाने मागील सामन्यात शानदार खेळ केला होता. मात्र त्यांचे गोलंदाज संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आजच्या सामन्यात राजस्थान मधल्या फळीत बदल करू शकतो. पुन्हा एकदा रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स सलामीला येण्याची शक्यता आहे. मधल्या फळीची कमान स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोस बटलर, राहुल तेवतिया आणि रियान पराग यांच्यावर असणार आहे. गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि वरूण अॅरोन यांच्यावर जबाबदारी आहे.
दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे काही दिवस खेळू शकणार नसल्यामुळे चेन्नईच्या चिंतेत भर पडली आहे. धोनीच्या नेतृत्वक्षमतेच्या बळावर सनरायझर्स हैदराबादला नमवल्यानंतर चेन्नईची गाडी रुळावर येईल, अशी अपेक्षा होती. परंतु ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका दिल्लीविरुद्ध त्यांना बसला. फाफ डु प्लेसिस आणि सॅम करन डावाची सुरूवात करू शकतील. शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, धोनी, रविंद्र जडेजा, केदार जाधव यांच्यार मधल्या फळीची मदार असणार आहे. गोलंदाजीत जोस हेजलवूडला संधी मिळू शकते. याशिवाय शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा यांच्यावर भार असणार आहे.
दरम्यान, दोन्ही संघांना अद्याप पाच-पाच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा मार्ग खडतर आहे. कारण उभय संघांसाठी एकही पराभव त्यांची वाटचाल खंडित करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
- चेन्नईचा संभाव्य संघ -
- फाफ डु प्लेसिस, शेन वाटसन, अंबाटी रायुडू महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, केदार जाधव, सॅम करन, जोस हेजलवुड, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि कर्ण शर्मा.
- राजस्थानचा संभाव्य संघ -
- रॉबिन उथप्पा, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, जोस बटलर, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, रियान पराग, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि वरुण अॅरोन.