अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा १३ वा हंगाम खराब ठरला. कारण ते प्ले ऑफ फेरी गाठू शकले नाहीत. आज चेन्नई पंजाबविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळत आहे. हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, डॅनी मॉरिसन यांनी धोनीला विचारले की, चेन्नई सुपर किंग्जकडून हा तुझा अखेरचा सामना आहे का? त्यावर धोनीने दोन शब्दात भन्नाट उत्तर दिले.
धोनी म्हणाला, नक्कीच नाही. दरम्यान, धोनीच्या उत्तराने त्याचे चाहते नक्कीच सुखावले असतील.
चेन्नईने १३व्या हंगामात सर्वांना निराश केले. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईची एक्सप्रेस गाडी रुळावरून घसरली, ती प्ले ऑफच्या शर्यतीतून बादच झाली. पण, मागील दोन सामन्यांत विजय मिळवून चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांच्यातला स्पार्क दाखवला आहे. पण ते स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या नामुष्कीनंतर आयपीएल २०२१ साठी संघात बरेच बदल केले जातील, याचे संकेत फ्रँचायझीने दिले आहेत.