मुंबई- आयपीएलच्या रणसंग्रामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आतापासूनच सर्व संघांनी विजेतेपदासाठी कंबर कसली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ ५ विजेतेपदासाठी उत्सुक आहे. पण, स्पर्धा सुरू होण्याआधीच रोहितसह मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा एक महत्वाचा शिलेदार आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने मुकणार आहे.
मुंबईसाठी महत्त्वाचा असलेला 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगा सुरुवातीच्या काही मॅचना मुकणार आहे. वैयक्तिक कारणामुळे मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅच खेळू शकणार नाही. मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिंगा वडिलांसोबत असणार आहे.
मलिंगा मुंबई इंडियन्साठी हुकमी एक्का -
लसिथ मलिंगा मुंबईसाठी नेहमीच हुकमी एक्का ठरला आहे. मागील वर्षी मुंबईने चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरलं होतं. चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात मलिंगाने शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी २ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू करत मुंबईला चौथ्यांदा आयपीएल जिंकून दिले होते.
दरम्यान, मलिंगा सुरूवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. पण तो शेवटचे काही सामने व प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्स संघात असेल. ही बाब मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक आहे. आयपीएलचा १३ हंगाम यंदाच्या वर्षी युएईमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरला होणार आहे. तर अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
हेही वाचा -धोनी अन् रोहित शर्माचे फॅन्स उसाच्या शेतात भिडले, सेहवाग म्हणतो...
हेही वाचा -IPL इतिहासातील 'धाकड' रेकार्ड, जे तोडणं जवळपास अशक्य..