शारजाह - क्रिकेट चाहत्यांनी काल खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहिला. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात फलंदाजांनी तुफानी फलंदाजी केली. या सामन्यादरम्यान भन्नाट क्षेत्ररक्षणही पाहायला मिळाले. यात निकोलस पूरनने सीमारेषेवर हवेत सूर घेत अडवलेला चेंडू तर अप्रतिमच ठरला. निकोलस पूरनचे भन्नाट क्षेत्ररक्षण पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही चांगलाच भारावला. याशिवाय पंजाबचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉन्टी रोड्सनेही पूरनचे कौतूक केले.
पंजाबने मयांक अग्रवालचे शतक आणि लोकेश राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावार प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली. बटलर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला.
संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक उंच फटका लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असे वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत सूर मारत तो षटकार अडवला. पूरनचे हे क्षेत्ररक्षण पाहून सचिन तेंडुलकर भारावला. त्याने आतापर्यंत मी पाहिलेले हे सर्वोत्तम क्षेत्ररक्षण असल्याचे म्हटलं आहे.