शारजाह - आयपीएलमध्ये काल रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने पंजाबच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करत मोठा विजय साकारला. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर अशक्यप्राय वाटणारे आव्हान राहुल तेवतियाच्या वादळी खेळीमुळे सोपे झाले. प्रत्येक षटकात १४ धावांची गरज असताना त्याने अवघ्या १२ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. डावाची सुरुवात संंथ गतीने करणाऱ्या तेवतियाने पंजाबच्या शेल्डन कॉटरेलला एका षटकात पाच षटकार ठोकण्याची किमया केली.
सामन्यानंतर तेवतिया म्हणाला, ''प्रशिक्षकांनी मला लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्यासाठी पाठवले होते. पण दुर्देवाने त्या षटकात मला मोठे फटके लगावता आले नाहीत. त्याऐवजी मी दुसऱ्याची गोलंदाजी फोडून काढली. मला पहिले २० चेंडू नीट खेळता आले नाहीत. पण मला आत्मविश्वास होता. मी जेव्हा डग-आऊटकडे पाहत होतो, तेव्हा मला सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. त्यांना मी चेंडू टोलावू शकतो, याची खात्री होती. त्यानंतर मला सूर गवसला.''