शारजाह - आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करत पंजाबने राजस्थानला २२४ धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानने हे आव्हान ४ गडी राखून पूर्ण केले. संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी या सामन्यात अर्धशतकं झळकावली. पण अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. राहुलच्या दमदार खेळीचे माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मजेशीर ट्विट करत कौतूक केले.
पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसम आणि स्टिव्ह स्मिथ यांनी डाव सावरला. पण दोघेही मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यानंतर राहुल तेवतियाने एक बाजू लावून धरली आणि सुरूवातीला सावध खेळ केला. जम बसल्यानंतर त्याने आक्रमक पावित्रा घेत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने खासकरून शेल्डन कोट्रेलला लक्ष्य केले.
तेवतियाने कोट्रेलच्या १८ व्या षटकात ५ षटकार खेचले आणि सामन्याचे चित्रच पालटलून टाकले. या कामगिरीसह तेवतियाने आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी साधली.