दुबई -किंग्स इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्सबंगळुरुचा तब्बल ९७ धावांनी पराभव केला. कर्णधार केएल राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर पंजाबने बंगळरुपुढे विजयसाठी २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, पंजाबच्या माऱ्यासमोर बंगळुरुच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बंगळुरुचा संघ १०९ धावांवर संपुष्टात आला. पंजाबने हा सामना ९७ धावांनी जिंकला. शतकी खेळी करणारा केएल राहुल सामनावीर ठरला.
बंगळुरुकडून वाशिंग्टन सुंदर याने दोन षटकार आणि एक चौकारसह सर्वाधिक ३० धावा केल्या. एबी डी विलियर्स याने १८ चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांसह २८ धावा केल्या. त्यापाठोपाठ एरोन फिंच याने २० आणि शिवम दुबे याने १२ धावा केल्या. कर्णधार कोहली तर एक धाव करून बाद झाला. आरसीबीची दोन खेळाडू जोश फिलिप आणि उमेश यादव तर शून्यावरच बाद झाले. तर इतर चार खेळाडू दुहेरी धावसंख्यादेखील गाठू शकले नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शेल्डन कोट्रेल याने 2 बळी तर मोहम्मद शमी आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अशाप्रकारे बंगळुरुचा पूर्ण संघ 109 धावांवरच बाद झाला आणि पंजाबच्या संघाचा विजय झाला.
तत्पूर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरूसमोर विजयासाठी २०७ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले आहे. राहुलने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३२ धावा केल्या. विराट कोहलीने लोकेश राहुलला दोन वेळा झेल सोडला आणि ते दोन झेल विराटच्या चांगलेच महागात पडले.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पंजाबच्या केएल राहुल आणि मयांक अगरवाल या सलामी जोडीने ६ षटकात ५० धावा धावफलकावर लावल्या. मयांक २६ धावांवर बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने बाद केले. यानंतर निकोलस पूरम आणि राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी करत संघाला शंभरी पार करुन दिली.