मुंबई- आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघ विजेतेपद पटकवण्यासाठी घाम गाळत आहेत. अशात बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. केकेआरच्या एका महत्वाच्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
केकेआरचा विदेशी गोलंदाज हॅरी गर्नी याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. हॅरीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आपल्या खांद्यावर उपचार घ्यावे लागणार आहेत. यासाठी त्याला काही आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. हॅरी आपल्या स्लो बॉलसाठी प्रसिद्ध असून त्याच्या त्या चेंडूवर अनेक फलंदाजांची भंबेरी उडत असल्याचे दिसून आले आहे.
याआधी मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू 'यॉर्कर किंग' लसिथ मलिंगाने आपण सुरुवातीच्या काही सामने खेळणार नसल्याचे सांगितले आहे. वैयक्तिक कारणामुळे मलिंगा आयपीएलच्या सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिंगा वडिलांसोबत असणार आहे.