दुबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. चेन्नई वगळता सर्व संघातील खेळाडू सराव सत्रात घाम घाळत आहेत. प्रत्येक संघ विजेतेपद पटकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने यंदाचे विजेतेपद केकेआर पटकावणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप म्हणाला की, आम्ही मागील दोन वर्षांपासून चांगल्या लयीत आहेत. पण आम्हाला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदाच्या वर्षी आम्ही जर चांगला समन्वय राखत विरोधी संघावर आक्रमण केलं तर नक्कीच विजेतेपद पटकावू. यंदा आमचा संघ बाजी मारू शकतो.
सनरायझर्स हैदराबादने २०१८ च्या हंगामात क्वालिफायर राऊंडमध्ये केकेआरचा पराभव केला होता. हा पराभव आमच्या जिव्हारीला लागला असल्याचेही कुलदीप म्हणाला. त्या सामन्यात माझ्या गोलंदाजीच्या स्पेलनंतर राशिद खानने वेगाने धावा जमवल्या आणि आम्हाला पराभवाच्या खायीत ढकलले, असेही कुलदीपने सांगितले.