आबुधाबी - जसप्रीत बुमराह त्याच्या घातक यॉर्कर बॉलसाठी ओळखला जातो. यामुळे त्याची ख्याती टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून आहे. त्याने अनेक अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयाची चव चाखून दिली आहे. पण, आयपीएल २०२० मध्ये बुमराहला एका खेळाडूंने सहा चेंडूत २७ धावा चोपल्या.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना काल (बुधवार) पार पडला. यात मुंबईने ४९ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत आपले गुणांचे खाते उघडले. या सामन्यात बुमराहने पहिल्या स्पेलमध्ये दमदार गोलंदाजी केली. पण सामन्याच्या १८ व्या षटकामध्ये बुमराहची लय बिघडली आणि तळाला फलंदाजीसाठी आलेल्या कोलकात्याच्या पॅट कमिन्सने त्याचा खरपूस समाचार घेतला. त्याने बुमराहच्या या षटकात २७ धावा वसूल केल्या.
कोलकाताविरुद्ध १८ व्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या बुमराहचा पहिला चेंडू पॅट कमिन्सनने मैदानाबाहेर टोलावला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार, चौथ्या चेंडूवर दोन धावा पुन्हा पाचव्या चेंडूवर कमिन्सनने षटकार लगावला. यामुळे बुमराहची लय बिघडली आणि त्याने षटकाचा शेवटचा चेंडू वाइड टाकला. अखेर षटकातील अतिरिक्त चेंडूवरही कमिन्सनने षटकार लगावला. अशाप्रकारे कमिन्सने बुमराहच्या सहा चेंडूत २७ धावा काढल्या.
दरम्यान, बुमराहने वैयक्तिक चौथे आणि सामन्यातील अठरावे षटक टाकण्याआधी आपल्या तीन षटकांमध्ये केवळ ५ धावा देत दोन गडी बाद केले होते. मात्र शेवटच्या षटकात त्याने २७ धावा दिल्या. हे षटक बुमराहच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वात महागडे शतक ठरले. त्याचबरोबरच एखाद्या फलंदाजाने बुमराहला एकाच षटकात ४ षटकार लगावण्याची ही पहिलीच वेळ होती.