दुबई - कोलकाता नाइट रायडर्सला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा स्टार गोलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शन विरोधात तक्रार करण्यात आली आहे. नरेनने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात केकेआरला दोन धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याआधी देखील नरेनच्या विरोधात अशी तक्रार करण्यात आली आहे.
सुनील नरेन गोलंदाजीदरम्यान... सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनच्या तक्रारीबद्दल आयपीएल व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आली आहे. यात त्यांनी, मैदानातील पंच उल्हास गांधी आणि ख्रिस गफाणे यांनी नरेनच्या संशयित गोलंदाजीच्या अॅक्शनविरुद्ध अहवाल तयार केला आहे. यात सुनील नरेनला ताकीद देत इशारा यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी, नरेनला गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.
नरेन विरोधात आणखी एक अशी तक्रार आल्यास त्याला आयपीएलमध्ये गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात येईल. त्यानंतर नरेनला आयपीएलमधील गोलंदाजीसाठी बीसीसीआयच्या बॉलिंग अॅक्शन कमिटीकडून क्लीनचिट घ्यावी लागेल. यामुळे नरेनसाठी आता स्पर्धेतील पुढचा प्रवास सोपा नसेल.
याआधी २०१५मध्ये नरेनविरोधात आयपीएलमध्ये तक्रार आली होती. नरेनने पंजाबविरूद्धच्या सामन्यात चार षटकांत २८ धावा देत दोन गडी बाद केले होते. त्याने निकोलस पूरम आणि मनदीस सिंह यांना मोक्याच्या क्षणी बाद करत सामना केकेआरच्या बाजूने फिरवला. पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, नरेनच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने चेंडू टोलावलाही, पण तो चेंडू अवघ्या एका इंचाने सीमा रेषेजवळ पडला आणि त्या चेंडूवर पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या अन् केकेआरने हा सामना दोन धावांनी जिंकला.