महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL : इतिहासात पहिल्यांदाच घडलं, एकाच दिवसात झाल्या तीन सुपर ओव्हर - mi vs kxip Super Overs match

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी दोन सामन्यांत तीन सुपर ओव्हर रंगल्या. तेराव्या हंगामात काल रविवारी डबल हेडरमध्ये झालेल्या दोन सामन्यांत एकूण ३ सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाली.

IPL 2020: History is made as IPL witness 3 Super Overs in one day for the first time
IPL इतिहासात पहिल्यांदाच घडलं, एकाच दिवसात झाल्या तीन सुपर ओव्हर

By

Published : Oct 19, 2020, 11:58 AM IST

दुबई - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी दोन सामन्यांत तीन सुपर ओव्हर रंगल्या. तेराव्या हंगामात काल रविवारी डबल हेडरमध्ये झालेल्या दोन सामन्यांत एकूण ३ सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे, एका सामन्यात पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला.

रविवारी पहिला सामना, कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये दिवसा रंगला होता. या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत कोलकाताने २० षटकांत १६३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताच्या लॉकी फर्ग्युसनने ३ चेंडूत २ धावा देत २ बळी घेतले. त्यानंतर कोलकाताचे इयॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक यांनी ३ धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

सायंकाळी मुंबई आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना रंगला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७६ धावा केल्या. तेव्हा पंजाबने देखील प्रत्युत्तरादाखल १७६ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शमीने शेवटच्या चेंडूवर एक धाव दिली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयांक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.

एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांनी या हंगामात आजच्या आधी १-१ सुपर ओव्हर खेळली होती. दोन्ही संघ त्यात पराभूत झाले होते. पण रविवारी मात्र सुपर ओव्हरच्या सामन्यात पंजाबने बाजी मारली.

ABOUT THE AUTHOR

...view details