मुंबई - चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात टिच्चून मारा करत विजय मिळवला. विजयानंतर न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने कोलकाता संघाचे कौतूक केले. तसेच त्याने, धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला अशा संंघर्षपूर्ण परिस्थितीतून जाताना कधीच पहिलं नसल्याचे म्हटलं आहे.
स्कॉट स्टायरिसने या संदर्भात एक ट्विट केले आहे. तसा मी कोण आहे? जो ब्रँडन मॅक्युलन आणि दिनेश कार्तिक यांच्या रणणितीवर प्रश्न उपस्थित करेल... पण शेवटच्या १० षटकात कोलकाताने शानदार गोलंदाजी केली. याआधी चेन्नईला अशा संंघर्षपूर्ण स्थितीत कधीच पहिलं नाही, असे स्टायरिसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
चेन्नईच्या पराभवानंतर बोलताना धोनी म्हणाला, 'मधल्या षटकांमध्ये केकेआरच्या गोलंदाजांनी २-३ षटके चांगली गोलंदाजी केली. या दरम्यान, आम्ही लागोपाठ २-३ विकेट गमावल्या. जर त्या षटकात आम्ही सांभाळून फलंदाजी केली असती तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता.'
पुढे गोलंदाजीविषयी धोनी म्हणाला, नवीन चेंडू असताना आम्ही खूप धावा दिल्या. पण मधल्या आणि शेवटच्या काही षटकात कर्ण शर्मा, सॅम करन यांनी सुरेख गोलंदाजी केली. कोलकाताने दिलेले हे आव्हान आम्ही सहज पूर्ण करायला हवे होते. परंतू आमच्या फलंदाजांनी, गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवले. अशा शब्दात धोनीने सामना संपल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, कोलकाताने महत्वाच्या क्षणी विकेट घेत चेन्नईला बॅकफूटला ढकलले. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. तर प्रथम फलंदाजीदरम्यान, ८१ धावा करणारा राहुल त्रिपाठी सामनावीर ठरला.