आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना जिंकत चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरुवात केली. चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून चेन्नईने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला १६२ धावांवर रोखले. या सामन्यात चेन्नईकडून फाफ डु-प्लेसिसने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दोन अप्रतिम झेल घेतले.
रवींद्र जाडेजा चेन्नई संघाकडून १५ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याचा पहिलाच चेंडू मैदानात स्थिरावलेल्या सौरभ तिवारीने उंच टोलावला. तो फटका सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या डु प्लेसिसने मोठ्या चपळाईने टिपला. यानंतर जाडेजाच्या त्याच षटकात डु-प्लेसिसने हार्दिक पांड्याचाही भन्नाट झेल घेत क्षेत्ररक्षणात आपले योगदान दिले. डु-प्लेसिस या दोन झेलमुळे चेन्नईला मुंबई इंडियन्सच्या धावगतीला वेसण घातला आली. याशिवाय डु-प्लेसिसने फलंदाजीतही आपले योगदान दिले.