दुबई - आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी इयान मॉर्गनकडे सोपवावी, अशी विनंती दिनेश कार्तिकने संघ प्रशासनाला केली होती. संघानेही ही विनंती मान्य करत संघाचे नेतृत्व मॉर्गनकडे सोपवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर ही माहिती दिली. इयान मॉर्गनच्या नेतृत्त्वात मागील वर्षी इंग्लंड संघाने विश्वकरंकावर नाव कोरले आहे.
दिनेश कार्तिकने सोडले कोलकाताचे कर्णधारपद
कोलकाताचे सीईओ वेंकी मैसूर म्हणाले, "दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूने आतापर्यंत संघाचे नेतृत्व केले यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. हा खूप कठीण निर्णय होता. कार्तिकच्या निर्णयामुळे आम्हाला थोडा धक्का बसला, परंतू त्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.''
कोलकाताचे सीईओ वेंकी मैसूर म्हणाले, "दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूने आतापर्यंत संघाचे नेतृत्व केले यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. हा खूप कठीण निर्णय होता. कार्तिकच्या निर्णयामुळे आम्हाला थोडा धक्का बसला, परंतू त्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. संघात मॉर्गनसारखा अनुभवी खेळाडू असल्यामुळे यापुढे तो नेतृत्व करेल. कार्तिक आणि मॉर्गन यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्येही हे दोन्ही खेळाडू अशीच कामगिरी करत राहतील असा आम्हाला विश्वास आहे.''
यूएईत सुरू असलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वात कोलकाता संघाची कामगिरी समाधानकारक आहे. कोलकाता सध्या ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आज कोलकाताचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.