शारजाह - आयपीएल २०२० मध्ये आज दुसरा सामना सायंकाळी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. तर, दुसरीकडे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेली दिल्लीची 'युवा ब्रिगेड' धम्माल करण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नईला यंदाच्या सत्रातील आशा कायम राखण्यासाठी दिल्लीविरुद्ध शानदार कामगिरी करावी लागणार आहे.
IPL २०२० : चेन्नईच्या 'वयस्करां'चा सामना दिल्लीच्या 'यंग बिग्रेड'शी - दिल्ली वि चेन्नई ड्रीम 11 संघ
आयपीएल २०२० मध्ये आज दुसरा सामना सायंकाळी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
![IPL २०२० : चेन्नईच्या 'वयस्करां'चा सामना दिल्लीच्या 'यंग बिग्रेड'शी ipl 2020 delhi capitals vs chennai super kings match preview](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9208169-883-9208169-1602917774675.jpg)
चेन्नईकडे धोनीचे कुशल नेतृत्व आहे. याशिवाय अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच सॅम करनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे चेन्नईची चिंता कमी झाली. गोलंदाजीत दीपक चहर, शार्दुल ठाकूर प्रभावी मारा करत आहेत. त्यांना कर्ण शर्मा आणि पीयूष चावला आपल्या फिरकीच्या माध्यमातून चांगली साथ देत आहेत. पण चेन्नईचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्होला अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही.
दुसरीकडे, दिल्लीचा संघ ८ सामन्यात १२ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीच्या युवा बिग्रेडने ६ विजय मिळवले आहे. दिल्लीला पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. परंतु आजच्या होणाऱ्या सामन्यात दिल्लीला कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय खेळावे लागू शकते. कारण त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. त्या सामन्यात शिखर धवनने संघाचे नेतृत्व केलं होतं. मार्कस स्टायनिस अष्टपैल कामगिरी नोंदवत आहे. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा व एनरिक नॉर्टर्जेसह फिरकीपटू आर. अश्विन व अक्षर पटेल प्रभावी कामगिरी करीत आहेत. तसेच मागील सामन्यात मराठमोळा तुषार देशपांडेने देखील चमकदार कामगिरी केली आहे.
- चेन्नईचा संभाव्य संघ -
- फाफ डु प्लेसिस, शेन वाटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सॅम करन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, पीयूष चावला आणि कर्ण शर्मा.
- दिल्लीचा संभाव्य संघ -
- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, अॅलेक्स कॅरी, मार्कस स्टायनिस, अक्षर पटेल, हर्षल पटेल, एनरिक नॉर्टर्जे, कागिसो रबाडा, आर अश्विन आणि तुषार देशपांडे.